मुहूर्त ठरला! म्हाडाची सोडत 8 ऑक्टोबरला, 2030 घरांसाठी आतापर्यंत 73 हजार अर्ज

म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी येत्या 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे. आतापर्यंत 75,571 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले असून 55 हजार जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. इच्छुकांना सोडतीसाठी 19 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार असून याच दिवशी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.

मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त 370 सदनिका आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 घरांचा समावेश आहे.

27 सप्टेंबरला सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाइन दावे -हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 3 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी म्हाडाच्या या संकेतस्थळावर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडत झाल्यानंतर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.