बॉक्स ऑफिसवर ‘कल्की’चा कल्ला, 12 दिवसांत जमवला एक हजार कोटींचा गल्ला

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ या साय-फाय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः ‘कल्ला’ केला आहे. अवघ्या 12 दिवसांत ‘कल्की’ने जगभरात सुमारे या एक हजार कोटींची घसघशीत कमाई करत यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटाचा मान मिळवला.

नाग अश्विन लिखित आणि दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हसन अशी तगडी स्टारकास्ट आहे. 27 जूनला पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल्की’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदुस्थानात 27.50 कोटींची तर जगभरात 190 कोटींची कमाई केली. अवघ्या पाच दिवसांत 600 कोटींचा गल्ला जमवत या चित्रपटाने आपला निर्मिती खर्च वसूल केला. येत्या आठवडय़ात कमल हसन यांचा बहुचर्चित ‘इंडियन 2’ हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचा फटका ’कल्की’ला बसणार का, याकडे आता साऱयांचे लक्ष लागलेय.

हिंदीत डबल सेंच्युरी

‘कल्की’च्या हिंदी व्हर्जननेदेखील आतापर्यंत 219 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून दुसऱया आठवडय़ातदेखील या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. दुसऱया आठवडय़ाच्या विकेण्डमध्ये ‘कल्की’ने तब्बल 50 कोटी रुपयांची कमाई केली. सोमवारी राज्यात मुसळधार पाऊस असतानादेखील सोमवारी या चित्रपटाने 6.75 कोटींचे कलेक्शन केले.

प्रभासच्या करिअरला नवसंजीवनी

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ नंतर प्रभासचे ‘साहो’, ‘राधेश्याम’, ‘आदिपुरुष’, ‘सालार’ हे चित्रपट एकामागोमाग एक आपटले. त्यामुळे प्रभासच्या करिअरला उतरती कळा लागल्याची चर्चा सुरू होती. ‘कल्की’ने केलेल्या घसघशीत कमाईमुळे प्रभासच्या करिअरला नवसंजीवनी मिळाली असून आपणच बॉक्स ऑफिसचा खरा ‘बाहुबली’ असल्याचे प्रभासने जगाला दाखवून दिले.