जकेरिया बंदरमध्ये बंद पडलेले रेशनिंग दुकान आता सुरू होणार, शिवसेनेच्या दणक्याने प्रशासन नरमले

जकेरिया बंदर विभागातील शिधा वाटप केंद्र आता लवकरच सुरू होणार आहे. या विभागातील शिधा वाटप लाभार्थ्यांना लांब रेशनिंग सुरू करण्यात आल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत होता. याची गंभीर दखल घेत प्रभाग क्रमांक 206 शिवसेनेच्या वतीने शिधा वाटप परिमंडळ ‘अ’वर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यामुळे येत्या दहा दिवसांत सदर दुकान पुन्हा चालू करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

जकेरिया बंदर विभागातील नागरिकांना अन्न पुरवठा विभागाच्या वतीने गेली कित्येक वर्षे त्या परिसरातील दुकान नंबर 15/32 या दुकानातून रेशन दिले जाते, परंतु काही कारणांमुळे सदर परिसरातील 326 रेशन कार्डधारकांचे रेशन या दुकानातून बंद करून सुंदर टॉवर येथील त्या वस्तीपासून अर्धा किलोमीटर लांब असलेल्या दुकानात चालू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी माजी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांना भेटून निवेदन दिले व या निवेदनाद्वारे जुन्या दुकानातूनच रेशन देण्यात यावे, अशी मागणीदेखील केली होती. याची दखल घेऊन आज माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या वतीने सदर प्रश्नासाठी या परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शिधावाटप अधिकारी परिमंडळ ‘अ’चे कल्पेश संखे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून संबंधित रेशन दुकान पूर्वीप्रमाणेच दहा दिवसांत नियमित जागेवर सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.