मानखुर्द बालसुधारगृहात मुलांना मिळतेय प्रेरणादायी मार्गदर्शन

मानखुर्द बालसुधारगृहातील मुलांना भविष्यातील संधी, कौशल्य, आत्मविश्वास, आयुष्यातील खडतर परिस्थितीवर मात करून स्वतःला घडवण्यासाठी दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या वतीने ‘संवाद बालमनाशी, उद्याच्या भविष्याशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात येत असून हा कार्यक्रम 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य संचलित दि चिल्ड्रेन्स एड् सोसायटी संस्थेने समाजातील अनाथ, निराधार, निराश्रित, गरजू मुलांना भविष्यात स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) स्थापना केली आहे. या संस्थेत जोडारी (फिटर), तारतंत्री (वायरमन) व इलेक्ट्रॉनिक मेपॅनिक हे तीन व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. बालगृहातील प्रवेशिताना मोफत प्रशिक्षण देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. संस्थेला 1983 साली सर्वोत्कृष्ट बालसुधारगृहाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. संपर्क-मुख्याध्यापक स्वप्नील घाटे-8888703040.

मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यास होतेय मदत

बालगृहातील दहावी पास/नापास बालकांना येथे प्राधान्याने प्रवेश दिला जातो. शाळेतील शिक्षण, संस्थेतील संस्कार आणि आयटीआयमधील काौशल्य प्रशिक्षण यामुळे ही बालके एक सुजान नागरिक म्हणून समाजाच्या मुख्य प्रवाहात येतात. 1989 मध्ये स्थापन झालेले हे छोटेसे रोपटे आज अनेक बालकांचे आधारवड झाले आहे. आतापर्यंत हजारो प्रशिक्षणार्थी येथून कुशल प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले असून ते बीएआरसी, रेल्वे, माझगाव डॉक, महानगरपालिका, नेव्ही, एमएससीबी, मुंबई पोलीस, म्हाडा, ओएनजीसी, गोदरेज, भारत बिजली, अदानी अशा नामांकित पंपन्यात तसेच अनेक सरकारी व निमसरकारी आस्थापनेत सन्मानजनक हुद्दय़ावर, पदावर कार्यरत आहेत. यात अनाथ बालकांची संख्या मोठी आहे.