पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी करंडक स्पर्धा ही अन्यत्र हलविण्याची कोणतीही योजना नाही, असे स्पष्ट संकेत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जो एलार्डिस यांनी दिले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात न जाण्याची भूमिका घेणाऱ्या हिंदुस्थानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला पाकिस्तानात सुरूवात होत आहे. मात्र, तणावपूर्ण संबंधांमुळे हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याची भूमिका घेतली आहे. दहशतवादी हल्यांच्या पार्श्वभूमीवर 2008 नंतर हिंदुस्थानने पाकिस्तानात एकही क्रिकेट स्पर्धा खेळलेली नाही.
मात्र, आयसीसीचे मुख्य कार्यकारी जो एलार्डिस यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे ठिकाण बदलण्याची कोणतीही योजना नाही, असे स्पष्ट केले. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले होते की, केंद्र सरकारने परवानगी दिली तरच टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला पाठवले जाईल. त्यामुळे हिंदुस्थान आता काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.