मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) एकाच वेळी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर दुहेरी पदवीचे शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी ‘आयडॉल’ने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय व स्वायत्त महाविद्यालयांना एक पत्र पाठवून दुहेरी पदवीच्या शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मराठीबरोबर इतिहास विषयातही पदवी घेऊ शकतो. तसेच दुहेरी पदवी शिक्षणासाठी विद्यार्थी मराठी, गणित, इतिहास, राज्यशास्त्र यांसारख्या पारंपरिक विषयांसह रोजगाराभिमुख आणि विद्यार्थ्यांच्या आवडीच्या कलागुणांशी संबंधित संगीत, चित्रकला, नाटय़ आदी विषय निवडू शकतात. नोकरी सांभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी, काही कारणास्तव अर्धवट शिक्षण राहिलेले आणि गृहिणींनाही ‘आयडॉल’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या दुहेरी पदवी शिक्षणाचा लाभ होईल’, असे ‘आयडॉल’चे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी सांगितले.