चालू शैक्षणिक वर्षापासून सहावी, नववी आणि अकरावीच्या वर्गांसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क (एनसीआरएफ) लागू करण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. शालेय एनसीआरएफ हा सीबीएसईचा पायलट प्रोजेक्ट असून शाळांनी यात सहभागी होण्याचे आवाहन सीबीएसईने केले आहे.
शालेय, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचे एकत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत गेल्या वर्षी एनसीआरएफ लॉन्च केले होते. त्यानुसार पूर्वप्राथमिक स्तरापासून थेट पीएचडीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे क्रेडिट जमा करता येणार आहे. सीबीएसईने एनसीआरएफची प्रयोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एनसीआरएफच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची यंदापासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.
पायलट प्रोजेक्ट आपल्या शाळेत राबविण्यासाठी इच्छुक असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी (https://forms.gle/5AB2iu²a1k62r2E3A) या लिंकवर संपर्क साधावा, असे आवाहन सीबीएसई बोर्डाने केले आहे. बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण किंवा कौशल्य शिक्षणातील सर्व व्रेडिटसाठी एकूण 40 क्रेडिट दिले जातील. “विद्यार्थी 40 क्रेडिटपेक्षा जास्त अभ्यासक्रम/कार्यक्रम/विषय/प्रकल्प घेऊ शकतात आणि त्यासाठी अतिरिक्त क्रेडिट मिळवू शकतात. विद्यार्थ्यांनी कमावलेली क्रेडिट शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये (एबीसी) जमा केली जातील. पुढे ती अपार आयडी आणि डिजीलॉकरशी जोडली जातील, असेही बोर्डाने म्हटले आहे.