महायुती सरकारमध्ये मलईदार खात्यांवरून तीनही पक्षांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे शनिवारी होणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त टळला आहे. आता विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवार, 15 डिसेंबर रोजी नागपूर येथील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान, राज्यपालांनी 19 तारखेचा नागपूर दौरा रद्द केला असून ते 15 डिसेंबरला नागपुरात दाखल होणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेत मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.