शहराचा विकास आराखडा हा महापालिकेने नव्हे तर बिल्डरांनी तयार केला आहे. हा विकास आराखडा ठाण्याला उद्ध्वस्त करणारा असून विकास आराखड्यातून जागा वाचवण्यासाठी स्क्वेअर फूट मागे पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे कळवा-मुंब्रा विधानसभेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आज केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून बिल्डर लॉबीकडून करोडो रुपये घेतले जात असून ही सर्व नावे 23 तारखेनंतर जाहीर करणार असल्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला.
ठाणे शहरात नवीन विकास आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या विकास आराखड्यात घोडबंदर, बाळकूम, कळवा आणि खारेगावमधील डीपी रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले असून यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची आणि भूमिपुत्रांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. विकास आराखडा फक्त कळवा मुंब्याला नव्हे तर शहराला उद्ध्वस्त करणारा असून आराखडा रद्द करण्याची मागणी आव्हाड यांनी केली.
अख्खे ठाणे खायचा विचार
खारेगावमधून डीपी रस्त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. आगरी समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा संशय आव्हाड यांनी व्यक्त केला. तसेच अख्खे ठाणे खायचा विचार सुरू असून जोपर्यंत यापूर्वी ज्यांनी अशी कामे केली आहेत त्या आयुक्तांना दणका बसला पाहिजे, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.