
गेल्या तीन दिवसांपासून पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विजयनगर येथील बेपत्ता असलेल्या राजू किसन कापसे (35) याच्या मृतदेहाचे डोके धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगावजवळ अढळून आले. युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत आणल्यानंतर या ठिकाणी कापसे यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारातील सदस्यांनी आरोपींना अटक करा, अशी मागणी केल्याने घाटी रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी करून नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून अंत्यसंस्कार करण्यासाठी राजू कापसे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
विजयनगर भागातील बेपत्ता तरुण राजू कापसे याचा धडाशिवाय मृतदेह सापडल्याची माहिती पसरल्यानंतर, त्याच्या नातेवाईक व मित्रांनी बुधवारी (11 सप्टेंबर) रोजी घाटी गाठले. या नातेवाईकांनी आरोपीला अटक करा, त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करा, अशी भूमिका घेतली होती. पुंडलिकनगर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला असता तर ही वेळ आलीच नसती, असा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयाचे अधिकारी व करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे व पुंडलिकनगर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यासाठी परवानगी दिली. शवविच्छेदनानंतर कापसे यांच्यावर गादिया विहार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कापसे यांच्या पश्चात सात महिन्याची गरोदर पत्नी, सात वर्षाचा मुलगा, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.
ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू
धुळे-सोलापूर महामार्गावर पांढरी पिंपळगाव येथे शिर नसलेला मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्यासह करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी भेट दिली. श्वानपथक, फॉरेन्सीक तज्ज्ञांकडून रात्री उशिरापर्यंत तपास करण्यात आला. याशिवाय ग्रामीण गुन्हे शाखेची टीम व अन्य पथकांकडून तपास सुरू आहे.