नव्वदीतला खळाळता उत्साह, मनमोकळेपणाने रसिकांशी संवाद साधण्याची आस, स्वरांमधील तेच चैतन्य घेऊन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले आज रसिकांच्या भेटीला आल्या. त्यांनी गाणी आणि गप्पांतून रसिकांच्या हृदयाची तार छेडली. पण त्याचवेळी ‘माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा…’ असे हळवं वक्तव्य केलं. त्यांच्या भैरवीच्या शब्दांनी सारेच हेलावून गेले. सबकुछ ‘आशा’मय करणारा अनुभव रसिकांनी घेतला. निमित्त होतं ते ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचे.
आशा भोसले यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात हा कार्यक्रम रंगला. यावेळी रसिकांशी संवाद साधताना आशा भोसले यांनी आपल्या आठवणींना मोकळी वाट करून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी झालेली पहिली भेट, लहान असताना कडेवर घेऊन फिरवणाऱया हृदयनाथ मंगेशकरांनी मोठेपणी आपल्याकडून गाऊन घेतलेली अनवट गाणी, बाबूजींपासून आर. डी. बर्मन यांच्यापर्यंत सगळय़ा संगीतकारांनी नकळत घडवलेली आपल्यातील गायिका अशा अनेकानेक गोष्टींवर आशाताई बोलल्या.
प्रत्येक माणसाला काही ना काही प्रेरणा मिळत जाते. हृदयातली ही प्रेरणा, काहीतरी करून दाखवण्याची आग विझू देऊ नका, असा मंत्र आशाताईंनी दिला.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही लहानपणापासून आपल्याला सांभाळणारी, आठव्या वर्षापासून घरातील स्वयंपाक, धुणीभांडी सगळय़ा जबाबदाऱया नेटाने निभावणारी आशाताई मोठी गायिका कधी झाली हे कळलेच नाही, असे सांगत त्यांच्या ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ या गाण्याची जन्मकथा सांगत आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, गायक सुरेश वाडकर, रवींद्र साठे, सुदेश भोसले, श्रीधर फडके, गायिका पद्मजा फेणाणी, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेत्री पूनम धिल्लाँ, आमदार आशीष शेलार, व्हॅल्युएबल ग्रुपचे नरेंद्र हेटे आणि अमेय हेटे, जीवनगाणीचे प्रसाद महाडकर उपस्थित होते.
दीदींच्या आठवांचा गहिवर
सोहळय़ाचा समारोप करताना दीदींच्या आठवणींनी आशाताईंना गहिवरून आले. ‘लतादीदींच्या आठवणीशिवाय कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही पाच पांडव आहोत. मला घरी सगळे भीम म्हणायचे. आमच्यातील एक गेला असला तरी आम्ही सगळी भावंडं एका मुठीसारखे बंद राहू,’ असे भावोद्गारही त्यांनी यावेळी काढले. ‘मोगरा फुलला’ गाणं दीदीच्या मुखात छान वाटत होतं. तिने आम्हाला सांभाळलं आणि अजूनही सांभाळते आहे, असे आशाताई म्हणाल्या.