मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात महिला मानवी बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. तिच्याकडे दहशतवाद्यांचे 80 लाख रुपये आहेत. ती दिल्लीहून लंडनला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन त्या विमानाची तपासणी केली तेव्हा अफवेचा प्रकार समोर आला. महिलेची बदनामी करण्याच्या हेतूने तो फोन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नियंत्रण कक्षात एक फोन आला. पह्न करणाऱ्याने तिची ओळख सांगितली. ती मानवी बॉम्ब आहे. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने ती प्रवास करत आहे. दिल्लीहून ती विदेशात जाणार आहे. त्या महिलेचा प्रियकर लंडन येथे राहतो. तसेच त्या महिलेकडे दशतवाद्यांचे 80 लाख रुपये आहेत अशी माहिती देऊन त्याने फोन ठेवला. याची माहिती समजताच मुंबई पोलिसांचे बीडीडीएस पथक घटनास्थळी आले. दिल्लीला जाणाऱ्या प्रत्येक विमानातील प्रवाशांची तपासणी केली. ती बॉम्बची अफवा असल्याचे समोर आले. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्या महिलेची बदनामी करण्याच्या हेतूनेच तो फोन केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.