पीओपी गणेशमूर्तींना सक्षम पर्याय द्या! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी

मुंबईत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात शहर व उपनगरात तब्बल बारा हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि दोन लाखांहून जास्त ठिकाणी घरगुती उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे देश-विदेशातूनही लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या काळात दहा हजार कोटींवर उलाढालही होते. त्यामुळे तब्बल 125 वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींऐवजी इतर साहित्यापासून मूर्ती तयार करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सक्षम पर्याय द्यावा, अशी मागणी मंडळांकडून करण्यात आली आहे.

गणेशोत्सव 2025 च्या संदर्भात पूर्वतयारीच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने आज उपआयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याकडे बैठक घेण्यात आली. मुंबई उपनगरे श्री सार्वजनिक समन्वय समिती सचिव विनोद घोसाळकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समतीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, ‘लालबागचा राजा’चे सुधीर साळवी, गिरीश वालावलकर, मूर्तिकार आदी उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. मात्र यासाठी पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीला पर्याय सुचवावा अशी मागणी करण्यात आल्याचे उपनगर समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर यांनी दिली. यासाठी संबंधित पर्यावरण विभाग व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीला पर्याय सूचित करणे आवश्यक असल्याचे दहिबावकर म्हणाले.

पुरेशा सुविधा, पीओपीला पर्याय देण्यासाठी ठराव

यावेळी उपनगर गणेशोत्सव समितीचे विनोद घोसाळकर यांनी पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचे स्वागत केले. मात्र घरगुती मूर्तींची संख्या व सार्वजनिक मूर्तींची संख्या पाहता उपलब्ध सुविधा अत्यंत तुटपुंज्या असून यावर केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांनी पर्याय द्यावा, असा प्रस्ताव विनोद घोसाळकर यांनी मांडला. याला अॅड. नरेश दहिबावकर, लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी, मूर्तीकार संघाचे नीलपंठ राजम यांच्यासह सर्व संघटनांनी पाठिंबा दिला.