मुख्य रस्ते किंवा सिग्नल ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांसह अंध दिव्यांग व्यक्तींना तारेवरची मोठी करसरत करावी लागते. मात्र ठाण्यातील अंध आणि दिव्यांग व्यक्तींना बिनधास्त रस्ता ओलांडता येणार आहे. महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने ठाण्यातील तीन हात नाका येथे देशातील पहिला ‘सुगम्य सिग्नल’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा सिग्नल मोठा असल्याने त्याठिकाणी अंध-दिव्यांग नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या ठिकाणी रॅम्प बसवण्यात येणार आहेत. तसेच रॅम्पसाठी उभारलेल्या पिलरवर बिपर लावण्यात येणार आहे. या बीप आवाजाच्या संकेताने त्यांना रस्ता ओलांडणे सोपे होणार आहे.
ठाण्यात नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढत आहे. तीन हात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी – माजिवडा अशा मुख्य चौक जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी पादचारी व दृष्टिहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. यासाठी दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आला आहे. ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलवर देशातील पहिली दिव्यांग पूरक (हॅडीकॅप अक्सेसेबल) सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. या ठिकाणी रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बिपर असणार असून जिथे चढ उतार असतील तिथे छोटे रॅम्प तयार करण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यावर असलेले विद्युत पोल व उभारलेल्या पिलरवर बिपर बसवण्यात येणार आहेत. या बिपरच्या मदतीने दृष्टिहीन दिव्यांगांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत होणार आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर ब्रेन लिपीमध्ये संदेशदेखील देण्यात आला आहे. नववर्षात ही दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.
रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी मार्ग नाही
ठाणे शहरातील प्रमुख सिग्नलपैकी नितीनचा सिग्नल सोडला तर इतर कोणत्याही सिग्नलवर भुयारी मार्ग किंवा पादचारी पूल उभारलेले नाहीत. पर्यायी मार्ग नसल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. अनेकदा बेशिस्त वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करतात. तर बेदरकार वाहनचालकांमुळे अपघाताच्या घटनाही समोर येतात. त्यामुळे दृष्टिहीन व दिव्यांगांसाठी हा उपक्रम वरदान ठरणार आहे.