भाजपाचा कार्यकर्ता म्हंटलं की गाववाले जोडे मारतात! गढूळ पाणी तुम्ही पिऊन दाखवण्याचा आमदाराला आग्रह

bjp-mla-ashok-uike

>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ

भाजपाचा कार्यकर्ता म्हंटल की गाववाले जोडे मारतात. आपली सत्ता असून गावकऱ्यांना अत्यंत खराब पाणी प्यावे लागत आहे. आम्ही पितो ते गढूळ पाणी तुम्ही पिऊन दाखवा आमदार साहेब असे खडे बोल भाजपा कार्यकर्त्याने भाजपा आमदार अशोक उईके यांना सुनावले. आपल्या कार्यकर्त्यांचे रौद्र रूप बघून यावेळी आमदार अशोक उईके अक्षरश: निरुत्तर झाले होते.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव हा आदिवासी राखीव मतदार संघ आहे. गेल्या दोन टर्म पासून भाजपचे अशोक उईके हे आमदार म्हणून निवडून येत आहे. राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कोच्ची या गावातील लोक सध्या भीषण समस्येला तोंड देत आहेत. शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली आहे. जे पाणी जनावराच्याही पिण्याच्या लायकीचे नाही असे पाणी पिण्यास गावकऱ्यांना भाग पडत आहे. गेल्या दोन वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची यंत्रणा उभी करण्याचे काम चालू आहे. पण ते अद्याप अपूर्णच आहे. मात्र प्रशासन या समस्येकडे दुर्लेक्ष करत असल्याचे गावकरी म्हणणे आहे.

कोच्ची येथील सचिन गोफने व शंकर जवादे गढूळ पाणी घेऊन राळेगाव येथील आमदारांच्या जनता दरबारात पोहचले, ह्यावेळी सचिन गोफने यांनी चक्क आमदारांसमोर ते गढूळ पाणी पाण्याची समस्या मांडली. बाटलीत आणलेले हे गढूळ पाणी शंकर यांनी चक्क आमदारांसमोर पिऊन दाखविले. उपस्थित इतर गावकर्यांनी हे गढूळ पाणी चक्क आमदार अशोक उईके यांना पिण्यास सांगितले. हे पाहून आमदार मात्र निरुत्तर झालेत.

संपूर्ण राळेगाव तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा फज्जा उडाला आहे. ‘हर घर पानी, हर नल पानी’ या पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेचा संपूर्ण तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे राळेगाव तालुक्यात भाजपा आमदारांना गावकऱ्यांच्या तीव्र रोषाला समोर जावे लागत आहे. पण असे गढूळ पाणी पिऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणे कितपत संयुक्तिक आहे हा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.