राज्यातील भाजप महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. कांदा, भाजीपाला, अन्नधान्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विरोधात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज दिले नाही;त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.यातून बाहेर पडून महाराष्ट्राला वाचवायचेअसेल तर पुन्हा एका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे लागणार आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन माजी खासदार, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले. यावेळी जनसमुदायाने ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.
सोनई येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार यशवंतराव गडाख बोलत होते. यावेळी कारभारी जावळे, अशोक गायकवाड, माजी आमदार पांडुरंग अभंग, उदयन गडाख, सुनील गडाख, विजय गडाख आदी उपस्थित होते.
यशवंतराव गडाख म्हणाले, भाजपच्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.सूडभावनेतून कारखान्यांना कर्ज न देणेही कोणती नीती आहे, असा सवाल त्यांनी केला. शंकरराव गडाख यांच्यासमोर अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत. आज तीन्ही-चारही पक्षांकडून शंकरावांना येण्यासाठी विनवण्या केल्या जात आहेत. मात्र, शंकरराव महाविकास आघाडीबरोबर ठाम राहिले याबाबत त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे ते म्हणाले.
थांबलेल्या योजना पुन्हा सुरू करणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मान्य करत मी विधानसभा निवडणूक ‘मशाल’चिन्हावर लढवत आहे, असे सांगत शंकरराव गडाख म्हणाले, आता महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे पैशांअभावी थांबलेल्या विकासयोजना मी पुन्हा सुरू करून दाखवणार आहे. जनतेने कायमच माझ्यावर प्रेम केले, विश्वास दाखवला, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे, असे सांगत सोमवारी (दि. 28) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जनतेने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन शंकरराव गडाख यांनी केले.
उद्धव ठाकरे प्रामाणिक आणि शब्द पाळणारे नेते
आपल्यामागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठामपणे उभे आहेत, आणखी काय पाहिजे? उद्धव ठाकरे यांच्यासारखा प्रामाणिक आणि शब्द पाळणारा नेता आपण आजपर्यंत पाहिला नाही. त्यामुळे संपूर्ण नेवासा तालुका आपल्यासोबत कायम राहील, असा शब्द मी देतो, असे यशवंतराव गडाख यांनी सांगताच, जनसमुदायाने ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा दिल्या