World Puppet Day- 105 वर्षांच्या ‘एका बाहुल्याची गोष्ट’- मिस्टर क्रेझी उर्फ अर्धवटराव!

अर्धवटराव आणि आवडाबाई बाहुल्यांच्या जगतातील एक सुप्रसिद्ध जोडपं. आजही अर्धवटराव किंवा आवडाबाई हे नाव डोळ्यांसमोर आल्यावर, केवळआपल्याला बोलक्या बाहुल्या आठवतात. रामदास पाध्ये यांच्या वडिलांनी म्हणजेच यशवंत पाध्ये यांनी अर्धवटरावांची निर्मिती 1916 साली केली होती.

यशवंत पाध्ये प्रसिद्ध जादूगार होते. या विद्येला नव्याने ओळख मिळावी याच हेतूने त्यांनी कागदावर एक चित्र रेखाटलं. हे चित्र पुढे केवळ एक चित्र राहिलं नाही, तर यातूनच अर्धवटराव अवतरले. अर्धवटराव हे नाव अर्ध वाटत असलं तरी या बाहुल्याने 100 पेक्षा अधिक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही अर्धवटराव आणि आवडाबाई प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

अर्धवटरावांच्या नावाचीही मोठी गंमत आहे. अर्धवटराव हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी तर परदेशी प्रेक्षकांसाठी अर्धवटरावांची ओळख Mr. Crazy अशी आहे. शब्दभ्रमकार यशवंत पाध्ये यांनी इंग्लंडच्या डेव्हनपोर्ट अॅंड कंपनीकडे एक बाहुला हवा असल्याची नोंदणी केली. बाहुला घरी आला तेंव्हा त्याचे हातपाय लाकडाचे होते. शरीर होतं फायबरचं. पाध्येंनी त्याचा चेहरा बदलला आणि हिंदुस्थानी पेहराव त्याला घालायला दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने अर्धवटराव जन्माला आले.

 

अर्धवटराव जन्माला आल्यानंतर अल्पावधीतच लंडनहून आणखीन तीन बाहुल्या मागविण्यात आल्या. आता खऱ्या अर्थाने अर्धवटरावांचे कुटूंब पूर्ण झाले होते. अर्धवटराव आणि आवडाबाई ही अजरामर पात्र मूळ लंडनहून हिंदुस्थानात आली होती.

अर्धवटराव आणि आवडाबाई या दोन्ही बाहुल्यांनी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 1960 साली अर्धवटरावांना एक नवीन ब्रेक मिळाला. तो म्हणजे बॉलिवूड मध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर मात्र अर्धवटरावांनी मागे वळून पाहिलं नाही.

यशवंतराव पाध्ये यांचा मुलगा रामदास हे बाहुल्यांच्या खेळासाठी त्यांना मदत करायचे आणि साथही द्यायचे. यशवंतरावांचं निधन 1967 मध्ये झाल्यानंतर, अर्धवटरावांचं पालकत्व रामदास पाध्ये यांच्याकडे आलं. त्यानंतर अर्धवटराव आणि रामदास पाध्ये या जोडगोळीने देशासह परदेशातही विविध कार्यक्रम केले.

अर्धवटराव आणि रामदास पाध्ये ही जोडगळी प्रसिद्ध झाली. एव्हाना आवडाबाईला मात्र अजूनही हवी तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. अखेर रामदास पाध्ये यांच्या पत्नीने आवडाबाईला बोलतं करण्यास सुरुवात केली. तिथूनच खऱ्या अर्थाने बाहुला नवरा बायकोची जुगलबंदी रंगली. आज पाध्ये कुटूंबातील पुढच्या पिढीने सत्यजितने रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये यांच्या पावलावर पाऊल टाकलेले आहे. सध्याच्या घडीला पाध्येंची तिसरी पिढी बाहुल्यांच्या खेळासाठी जगभरात भ्रमण करत आहे.