ग्रीन पार्कची बाल्कनी धोकादायक, कानपूर कसोटीपूर्वी पीडब्ल्यूडीकडून धोक्याची सूचना

कानपूरमध्ये शुक्रवारपासून हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी क्रिकेट सामना रंगणार आहे. मात्र या कसोटीपूर्वीच उत्तर प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमची बाल्कनी धोकादायक असल्याची सूचना दिली आहे. त्यामुळे या निर्णायक कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकसंख्येला कात्री लावण्याची नामुष्की ओढावली आहे.

उत्तर प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमच्या स्टॅण्डच्या संरचनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला (यूपीसीए) तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालावी लागली आहे. सामन्यादरम्यान हे स्टॅण्ड पूर्ण क्षमतेने भरल्यास खाली पडून दुर्घटना घडू शकते, असेही ‘पीडब्ल्यूडी’ने कळविले आहे. यूपी सरकारच्या पीडब्ल्यूडी विभागाच्या इशाऱ्यानंतर ‘यूपीसीए’चा तणाव वाढला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून बाल्कनी सी स्टॅण्डसाठी निम्म्याहून कमी तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

ग्रीन पार्क सरकारच्या मालकीचे

ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियम हे उत्तर प्रदेश सरकारच्या क्रीडा विभागाच्या मालकीचे आहे. ते थेट ‘यूपीसीए’ किंवा ‘बीसीसीआय’ यांच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे ‘पीडब्ल्यूडी’चे अधिकारी स्टेडियमची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने धोकादायक ठरविलेल्या स्टॅण्डमधील प्रेक्षक संख्या कमी केली आहे.

‘ग्रीन पार्क स्टेडियमच्या बाल्कनीतील सी स्टॅण्डची 4800 इतकी प्रेक्षकक्षमता आहे. मात्र खबरदारी म्हणून या स्टॅण्डमधील फक्त 1700 तिकिटे विकली जातील. पीडब्ल्यूडीने काही समस्या मांडल्या असून पुढील काही दिवस दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. चाहत्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आम्ही हा निर्णय घेतला आहे.’, असे यूपीसीएचे सीईओ अंकित चॅटर्जी यांनी सांगितले.