मिंधे सरकारने ‘लाडक्या बहिणीं’ना चुना लावला

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने जाहीर केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा कमी आणि मनस्ताप जास्त, अशी स्थिती महिलावर्गाची झाली आहे. मिंधे सरकारने ‘लाडक्या बहिणीं’ना चुना लावला आहे. महिलांनी पदरमोड करून अर्ज भरले. ते मंजूर झाल्याचे मेसेजही आले. मात्र बँक, पोस्ट खात्यात पैसेच जमा झाले नसल्याचा प्रकार भिवंडीत हजारो महिलांच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे महिलांमध्ये मिंधे सरकारविरोधात प्रचंड चीड असल्याचे पहायला मिळत आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील विद्याश्रम पोस्टात महिलांनी सेव्हिंग खाते उघडले. या योजनेसाठी शेवटची मुदत १५ ऑक्टोबर असल्याने आज पोस्ट आणि बँकेत गर्दी होती. अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज आल्यानंतर महिलांनी पोस्टात पैसे काढण्यासाठी गर्दी केली. परंतु खात्यात पैसे जमा न झाल्याने महिलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

‘लाडकी बहीण’ योजनेचे खाते उघडण्यासाठी पोस्ट आणि बँकेत महिलांनी गर्दी केली होती. असंख्य तरुणी आणि महिला सकाळपासून पोस्ट, बँकेबाहेर रांगा लावून होत्या. चार तास रांगेत राहूनही खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे पाहून महिला भगिनींचा हिरमोड झाला.