गेट वे ऑफ इंडियाजवळील दुर्घटना दुर्दैवी; बचावकार्याला यश येवो; आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा येथे जाणारी नीलकमल ही प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोटीमध्ये सुमारे 80 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती असून 66 प्रवशांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तेथे सुरू असलेल्या बचाव कार्याला त्वरित यश मिळावं आणि सर्व प्रवासी सुखरूप असावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात स्पीड बोटीच्या धक्क्याने एक प्रवासी बोट बुडाल्याचे वृत्त धक्कादायक आहे. ह्या दुर्घटनेत 30 ते 35 प्रवासी बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे. या बचाव कार्याला त्वरित यश मिळावं व सर्व प्रवासी सुखरूप असावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा येथे जाणारी नीलकमल या प्रवासी बोटीची दुसऱ्या बोटीला धडक झाली आणि त्यामुळे एक प्रवासी बोट बुडाली आहे. बोटीमध्ये 80 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या ठिकाणी नौदल, JNPT, Coast Guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे. काही प्रवाशांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढून गेट वे ऑफ इंडिया येथे आणण्यात आले आहे.