20 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव येत्या 12 ते 18 जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे होणार आहे. महोत्सवात निवडलेले चित्रपट सिटीलाइट सिनेमा, माहिम आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये दाखवले जातील.
यंदाच्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशियाई स्पेक्ट्रम विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका येथील बारा चित्रपटांचा समावेश आहे आणि इराणमधील सात चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील.
प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग असणार आहे. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
हिंदुस्थानी चित्रपट विभागात आत्मपॅम्पलेट, हाऊस ऑफ कार्डस, एपिसोड 13, सेयुज सनधन, आरोह एक प्रितिभी, मिनी, विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर, गोराई पाखरी अशा 12 चित्रपटांचा समावेश आहे.
मराठी स्पर्धा विभागात स्थळ, रघुवीर, महाराष्ट्र शाहीर, स ला ते स ला ना ते, जित्राब, गिरकी, गाभ, टेरिटरी, मदार असे नऊ चित्रपट आहेत.