
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा दिला. आढावा बैठका घेऊन या 100 दिवसांत काय कामे करणार हे ठरवले गेले, पण हा कार्यक्रम फेल गेला आहे. तीन महिने पूर्ण होत आले तरी कामे रखडलेलीच आहेत. परिणामी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर आली आहे. त्यानंतरही कामे पूर्ण होतील की नाही याची शाश्वती नसल्याचे संबंधित अधिकारी सांगतात.
महायुती सरकार गतिमान आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 7 जानेवारी रोजी हा 100 दिवसांचा कृती आराखडा प्रत्येक विभागाला दिला. प्रशासनाला शिस्त लागावी हा त्यामागचा उद्देश होता. या सात कलमी कार्यक्रमात कार्यालयांमधील सोयीसुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, गुंतवणूक आकर्षित करण्यास प्रोत्साहन, संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश आहे.
महायुती सरकारला 15 एप्रिल रोजी 100 दिवस पूर्ण होत आहेत. आतापर्यंत त्यातील 85 टक्के कामे म्हणजेच सुमारे 411 कामे पूर्ण झाल्याचा दावा सरकारने केला आहे, तर 372 कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या माहितीमध्ये बरीच तफावत असल्याचे सूत्रांकडून समजते. प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात येणाऱ्या कामांपैकी बरीचशी कामे 30-35 टक्केही पूर्ण झालेली नाहीत अशी वस्तुस्थिती आहे.