रील बनवण्याच्या नादात थार चालकाने चक्क रेल्वे रुळावर कार घातल्याची घटना जयपूरमध्ये घडली. याप्रकरणी थार गाडीसह चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढवण्यासाठी स्टंटबाजी करणे चालकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी कार चालकाविरोधात आरपीएफने रेल्वे अधिनियम कलम 153, 174, 147 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यधुंद अवस्थेत थार चालक मित्रांसह रेल्वे रुळावर कार चालवत रील बनवत होता. यादरम्यान ट्रॅकवर मालगाडी येत होती. ट्रेनला येताना पाहून कारचालकाने गाडी रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही आणि गाडी रुळावर अडकली. मालगाडीच्या सतर्कतेमुळे अखेर ट्रेनला रोखण्यात आली आणि पुढील अनर्थ टळला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ट्रेन रुळावरून खाली उतरवण्यात आली.
गाडी रुळावरून उतरवल्यानंतर कार चालक भरधाव वेगाने तेथून पळून गेला. यादरम्यान त्याने दोन-तीन जणांना धडक दिली. पोलिसांनी कार चालकाचा शोध घेत त्याला अटक केली. तसेच त्याच्या ताब्यातील थार गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.