ठाण्यात दुपारच्या शाळांची घंटा वाजणार नाही, उन्हाचा तडाखा.. जिल्हा परिषदेच्या तीन हजार शाळांचे वेळापत्रक बदलले

दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढू लागल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. या उन्हाचा तडाखा आता शाळांनाही बसला असून ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा 2 हजार 997 शाळांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची झळ पोहोचू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुपारच्या शाळांची घंटा आता वाजणार नाही. सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत. दरम्यान उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि शिक्षकांनादेखील काही टिप्स दिल्या आहेत.

ठाण्यात दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात उन्हाचा पारा जवळपास 38 ते 40 अंश सेल्सिअस एवढा असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11.15 पर्यंतचे वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली. तर माध्यमिक शाळा 7 ते 11.45 या वेळेत भरवण्यात येतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी सांगितले.

अंमलबजावणी सुरू
ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 328 तर माध्यमिकच्या 1 हजार 669 शाळा आहेत. सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचा निर्णय सर्वांना लागू केला असल्याने लाखो विद्यार्थ्यांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे.

सुट्टी लागेपर्यंत निर्णय लागू
राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वार्षिक उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत हा निर्णय सर्व शाळांना लागू राहील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीदेखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे शहरातील कोपरी पूल, आईस फॅक्टरी, आशयर आयटी पार्क, किसननगर शाळा, तीन हात नाका, माजिवडा नाका, रेल्वे स्टेशन परिसर अशा विविध 25 ठिकाणी पालिकेने पाणपोया सुरू केल्या आहेत