ठाणे परिवहनच्या बसला आग, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

ठाणे येथील चेंदणी कोळीवाडा डेपो कडून दिवा खिडकाळी बस डेपोकडे निघालेल्या ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या एका प्रवासी बसला आग लागली. सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंब्रा, किस्मत कॉलनी येथे या बसला आग लागली. यावेळी बसमध्ये सुमारे 90 ते 100 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याची बाब वेळीच बसच्या वाहन व चालक या दोघांच्या लक्षात आल्याने त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बसमधून बाहेर उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर लागलेली आग अवघ्या दहा मिनिटांत नियंत्रणात आणण्यात ही यश आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

अपघातग्रस्त टीएमटी बस ही बसचालक केतन वाघचौडे आणि वाहक दयानंद दांडेकर हे दोघे सायंकाळी चेंदणी कोळीवाडा डेपोमधून घेऊन दिवा खिडकाळी डेपोला निघाले होते. ती बस सुमारे 90 ते 100 प्रवाशांनी खचाखच भरली होती. बस मुंब्रा किस्मत कॉलनी येथे येताच त्या बसच्या मागील बाजूस असलेल्या इंजिन कंपार्टमेंट मध्ये आग लागली. ही बाब लक्षात येताच, चालक वाघाचौडे यांनी बस बाजूला घेऊन वाहक दांडेकर यांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुखरूप बसमधून खाली उतरवले. तसेच त्यांनी आगीची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस, ठामपा परिवहन कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच लागलेल्या आगीवर अवघ्या काही मिनिटांत नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.