ठाण्यातील तलावपाळीचा रस्ता झाला मोकळा; भाजी मार्केट, कोपिनेश्वर मंदिराकडे जाण्याचा वळसा वाचला

तलावपाळी बस स्टॉपकडून भाजी मार्केट किंवा कोपिनेश्वर मंदिराकडे येण्या-जाण्यासाठी नागरिकांना जांभळीनाका येथून लांबचा वळसा मारावा लागत होता. रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही सोय नसल्यामुळे नागरिकांची चांगलीच फरफट होत होती. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी भाजी मार्केट सेवा संघाने पाठपुरावा करत रस्त्याच्या मधोमध लावलेले बॅरिगेट्सचे ग्रील कापून बाजूला केले. तसेच रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग आणि स्पीड ब्रेकर उभारले आहेत. त्यामुळे तलावपाळीचा हा रस्ता आता मोकळा झाला आहे.

ठाणेकरांना भाजी मार्केट ते तलावपाळीचा रस्ता ओलांडणे सोयीचे व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट सेवा संघाचे अध्यक्ष अंकुश ठोंगे आणि संघाचे उपाध्यक्ष जय चोणकर यांनी महापालिका व वाहतूक विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. अखेर मंजुरी मिळाल्यानंतर एका रात्रीत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले. रस्त्याच्या मधोमध लावलेले बॅरिगेट कापून बाजूला केले. वाहतूक शाखेच्या मदतीने झेब्रा क्रॉसिंगचा पट्टा मारण्यात आला. तसेच झेब्रा क्रॉसिंगजवळ वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरही टाकण्यात आले. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी असणारा अडथळा दूर झाला आहे.

भाविकांना दिलासा
तलावपाळीच्या समोरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट, लहान मुलांसाठी बगीचे, कोपिनेश्वर मंदिर आहे. त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि लहानग्यांना तलावपाली बस स्टॉपकडे जाण्यासाठी जांभळी नाका येथून वळसा मारून जावे लागत होते. आता हा मार्ग मोकळा केल्यामुळे मंदिरात जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे.