
पालिकेच्या तरण तलावात पोहण्यासाठी जाताय तर आता जास्त पैसे घेऊन जावे लागणार आहे. कारण महापालिका प्रशासनाने प्रवेश शुल्कात भरमसाठ वाढ केली असल्याने स्विमिंग करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये १० टक्के, २०२५ वर्षात १५ टक्के आणि २०२६ या तिसऱ्या वर्षासाठी २० टक्के अशी ही दरवाढ करण्यात येणार आहे. दरम्यान सर्वच क्षेत्रात महागाई गगनाला भिडलेली असताना आता ठाणेकरांचे ‘पोहणे’ देखील महाग झाले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे पालिकेचे गडकरी रंगायतन येथे मारोतराव शिंदे तसेच कळवा परिसरात यशवंत रामा साळवी असे दोन तरण तलाव आहेत. या तलावात मोठ्या संख्येने नागरिक पोहायला येत असतात. या ठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षणदेखील दिले जाते. तर सहा महिने किंवा वार्षिक सभासददेखील करून घेण्यात येते. मात्र आता या सभासद शुल्कात वाढ करण्याचा निर्णय ठाणे पालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
तरण तलाव चालवणे झाले कठीण
तरण तलाव चालवणे पालिकेला कठीण जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेचे तरण तलाव हे उत्पन्नाचे साधन नसून ना नफा ना तोटा या धोरणानुसार ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरण तलाव चालवण्यासाठी येणारा खर्च, वेतन, साधनसामग्री, स्वच्छता, विद्युत उपकरणे व त्यावर होणारा विद्युत खर्च पालिकेला परवडत नाही. तसेच उत्पन्नात व खर्चात मोठ्या प्रमाणात तूट असल्याने पालिकेला शुल्कवाढीचा निर्णय घ्यावा लागत आहे.