
ठाणे जिल्ह्यावर सूर्यनारायणाने प्रकोपच केला. शहरासह ग्रामीण भागाचा पारा चाळिशी पार गेला असून मुरबाडची तर अक्षरशः भट्टीच झाली. सकाळी अकरानंतर उसळी मारलेल्या उष्णतेने दुपारी दोनपर्यंत कहरच केला. उन्हाच्या चटक्यांमुळे ठिकठिकाणच्या बाजारपेठा ओस पडल्या होत्या. कर्फ्यू लागावा अशीच अवस्था अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. डोंबिवली-बदलापूर 40.6, कल्याण-उल्हासनगर 40.8, कर्जत – 41.08, मुरबाड- 42 तर धसई-42.03 इतके तापमान होते. मागील 15 दिवसांत तापमानातील ही उचांकी वाढ होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते.
मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात उष्णतेची लाट आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळिशीच्या आतमध्ये आला होता. मात्र गुढीपाडव्यानंतर पुन्हा एकदा पाऱ्याने उसळी मारली असून आज सरासरी पारा चाळिशी पार केला. वाढत्या तापमानामुळे कोणी छत्र्या तर कोणी डोक्यावर रूमाल घेऊनच घराबाहेर पडू लागल्या आहेत. शितपेयांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. सहाळे, आईस्क्रीमवर ताव मारला जात असून पंखा, एसी, कुलरचा वापर वाढला आहे.
धसई का तापली?
ठाणे शहराचा पारा 39.01 अंश, मुरबाड 42 तर सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या धसईचे तापमान सर्वाधिक 43.03 अंश इतके होते, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली. दरम्यान या भागात गेल्या काही वर्षांत बेसुमार जंगलतोड सुरू असून डोंगरचे डोंगर बोडके केले आहेत. वनक्षेत्रातील राखीव जंगलांचीदेखील राखरांगोळी केली गेली आहे. मात्र याकडे अधिकारी कानाडोळा करत असल्यानेच धसईची भट्टी झाल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे.