ठाणे पालिकेला वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक कोटीचे ‘लक्ष्मीदर्शन’, 1 हजार 570 करदात्यांनी भरला 1 कोटी 80 लाखांचा मालमत्ता कर

ठाणे महापालिकेला नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक कोटीचे लक्ष्मीदर्शन झाले आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके आज करदात्यांना मोबाईलवर पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याला प्रतिसाद देत सुमारे 1 हजार 570 जागरूक ठाणेकर करदात्यांनी आज 1 कोटी 80 लाख रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.

पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रित महापालिकेकडे जमा केल्यास सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत देण्यात आली आहे. तसेच 1 एप्रिल ते 16 जून या काळात पूर्ण रक्कम भरल्यास 10 टक्के सूट, 16 ते 30 जून 4 टक्के, 1 ते 31 जुलै 3 टक्के आणि 1 ते 31 ऑगस्ट या काळात पूर्ण करभरणा केल्यास दोन टक्के सूट देण्यात येणार आहे. तरी करदात्यांनी मुदतीत मालमत्ता कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

केडीएमसीच्या तिजोरीत उल्लेखनीय वाढ
उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीचे 500 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार कर विभागाने 453 कोटी रुपयांची वसुली केली आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरल्याने तिजोरीत वाढ झाली. तसेच या आर्थिक वर्षात नियमितपणे कर भरण्याचे आवाहन केले असून करदात्यांनी ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये विक्रमी करवसुली
पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदा 241 कोटी 59 लाखांची विक्रमी वसुली केली आहे. मागील आर्थिक वर्षी 193 कोटी इतकी करवसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता करवसुली ही उत्कृष्टरीत्या व वेगाने झाली असून 48 कोटींची अधिक वसुली करण्यात आली आहे. तसेच वर्षानुवर्षे कर थकीत असलेल्या मालमत्ता जप्त कराव्यात असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.