
गेल्या 13 वर्षांपासून फक्त कागदावर असलेले ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात साकारणार आहे. नव्याने हे धोरण ठरवणार असून लवकरच शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण सुरू होणार आहे. या धोरणानंतर ठाण्यातील विविध 168 रस्त्यांवर 11 हजार 931 गाड्यांचे पार्किंग करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून पार्किंगमुळे पालिकेच्या तिजोरीतदेखील भर पडणार आहे.
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या ठाणे शहरात रस्त्यांचे मोठे जाळे असले तरी दिवसेंदिवस चारचाकी व दुचाकी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सोसायट्यांमध्ये या गाड्या पार्क करायला जागादेखील शिल्लक नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने नवे पार्किंग धोरण राबवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण वाहनांना हक्काचे पार्किंग उपलब्ध होणार आहे. शहरातील 168 रस्त्यांवर 6 हजार 477 दुचाकी, 1 हजार 546 तीन चाकी वाहने पार्क करता येतील. त्याशिवाय 3 हजार 360 हलकी चारचाकी वाहने व 548 अवजड चारचाकी गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे.
क्षमता वाढणार
2014 च्या सुमारास ठाणे पालिकेचे पार्किंग धोरण पुढे आले. त्यानुसार शहरातील १६६ रस्त्यांचा सर्व्हे झाला असून ते अंतिम करण्यात आले आहे. तसेच पार्किंगचे दिवस आणि रात्रीचे दरही अंतिम करण्यात आले आहेत. याठिकाणी 95000 वाहने पार्क होऊ शकणार होती. परंतु आता यात नव्याने बदल होऊन रस्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे वाहन पार्किंगची क्षमतादेखील वाढेल, असा अंदाज पालिकेने वर्तवला आहे.
■ पार्किंगसाठी अ, ब, क आणि ड अशी रस्त्यांची वर्गवारी करून त्याप्रमाणे वाहनांचे पार्किंग शुल्क निश्चित केले जाणार आहे. या शुल्कामुळे महापालिकेला दरमहिना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल.
■ यापूर्वीदेखील पार्किंग धोरण राबवण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यावेळी काही लोकप्रतिनिधींनी विशिष्ट रस्त्यांना विरोध केला. ते संबंधित रस्ते वगळून अन्य रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाईल.
■ येत्या एक महिन्यात पार्किंग धोरणाच्या दृष्टीने नव्याने रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्यानंतर प्रस्तावाला अंतिम स्वरूप देऊन मंजुरी मिळेल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.