मॅट्रिमोनियल साईटद्वारे ओळख करत 15हून अधिक महिलांवर बलात्कार; आरोपीला गुजरातमधून अटक

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख करून 15 हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी 26 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. वालीव पोलिसांनी गुजरातमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हिमांशू योगेशभाई पांचाळ असे आरोपीचे नाव आहे.

हिमांशूने मॅट्रिमोनियल साईटवर स्वतःचे बनावट प्रोफाईल बनवले होते. प्रोफाईलमध्ये तो दिल्ली गुन्हे शाखेचा सायबर सुरक्षा विभागातील अधिकारी असल्याचे भासवले होते. तसेच तो श्रीमंत कुटुंबातील असून त्याच्या अनेक मालमत्ता असल्याचाही त्याने उल्लेख केला होता.

मॅट्रिमोनियल साईटवर महिलांशी ओळख करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचा. मग त्यांना भेटायला बोलावून नकली हिऱ्यांचा हार भेट देऊन फसवणूक करायचा. मग त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. तसेच गरज असल्याचे सांगून पैसेही उकळायचा.

मीरा रोड येथील 31 वर्षीय तरुणीचीही आरोपीने अशा प्रकारचे फसवणूक केली. यानंतर तरुणीने वालीव पोलिसांत तक्रार दाखल केली. तरुणीने पोलिसांना सर्व घडला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक केली. आरोपीकडून पाच फोन आणि एक अ‍ॅपलचा लॅपटॉप हस्तगत केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.