![arrest](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/07/arrest-696x447.jpg)
बांगलादेशी नागरिकांना पकडण्याची जोरदार मोहीम उल्हासनगर क्राइम ब्रँचने सुरू केली आहे. त्यात पुन्हा एकदा आशेळे गावातून एका बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात आल्याने आशेळे परिसर हा बांगलादेशींचे आश्रयस्थान बनले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
यापूर्वी उल्हासनगर क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या टीमने आशेळे गावातून 6 जणांना अटक केली होती. याच गावातील कृष्णा नगरमधील एका चाळीत गेल्या दोन वर्षांपासून बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या टीमने छापा टाकला आणि 35 वर्षीय शहाजान दुलाल मुल्ला याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत शहाजान हा बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच बांगलादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या रूममालकावर देखील कारवाई केली जाणार आहे.
18 जणांच्या मुसक्या
डिसेंबर 2024 पासून उल्हासनगर क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी बांगलादेशींना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मानपाडा डोंबिवली-5, कोळशेवाळी-5, उल्हासनगर-1 आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे गाव-7 अशा 18 जणांना पकडण्यात यश मिळवले आहे.