![malang-gad](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/01/malang-gad-696x447.jpg)
जय मलंग… श्री मलंग, हिंदूंची वहिवाट… हीच मलंगमुक्तीची पहाट अशा जयघोषाने आज मलंगगड दणाणून गेला. निमित्त होते माघी पौर्णिमेचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 1982 पासून मलंगमुक्तीचा जागर सुरू झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आजही ही परंपरा अखंड सुरू आहे. यावर्षीही हर हर महादेव, शिवसेना झिंदाबाद असा गजर करत हजारो हिंदू भाविकांचे वादळ मलंगगडावर धडकले.
कल्याण, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पालघर, वसई, रायगड आदी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक उत्स्फूर्तपणे आले होते. भगवे ध्वज खांद्यावर घेतलेले शिवसैनिक आणि वाहनांवर फडकणाऱ्या भगव्या पताका असे सर्वत्र भारावून टाकणारे वातावरण होते. ‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ असा नारा देत सकाळपासूनच हिंदू भाविकांचे जथ्थे गडावर जाऊन मलंगबाबाच्या समाधीचे दर्शन घेत होते. पहाटे मलंगगडावर पालखी नेण्यात आल्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दुपारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मलंगनाथांच्या समाधीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह 16 हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने गडावर उपस्थित होते.
यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, धनंजय बोडारे, अल्पेश भोईर, कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे, शरद पाटील, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, प्रवीण म्हात्रे, मोहन मढवी, नरेश मणेरा, सुरेश मोहिते, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, समिधा मोहिते, धनश्री विचारे, उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील, प्रकाश चौधरी, विश्वास थळे, सोन्या पाटील, अनिष गाढवे, कांतीलाल देशमुख, नीलेश भोर, विभागप्रमुख प्रशांत सातपुते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे अन्नछत्र
मलंगगडाच्या पायथ्याशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची भूक भागवण्यासाठी शिवसैनिक दिवसभर उत्साहाने राबत होते. जवळपास 10 हजार मलंगभक्तांनी अल्पोपहार आणि भोजनाचा लाभ घेतला. शिवाय ठिकठिकाणी पाण्याची सोयही करण्यात आली होती.
भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांच्या सोयीसाठी एसटी आणि केडीएमटीच्या जादा बसेस कल्याणहून सोडण्यात आल्या होत्या. गडापासून एक किलोमीटर अंतरावर भाविकांची वाहने अडवली जात होती.