
छत्रपती शिवाजी महाराज यांचा डोंबिवली पूर्व इंदिरा चौकातील पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून मेघडंबरीविना आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही महापालिका प्रशासन कानाडोळा करत आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज रस्त्यावर उतरत पालिकेच्या मोघली कारभाराचा निषेध केला. शिवरायांचा पुतळा मेघडंबरीत बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून शिवसैनिकांनी मूक आंदोलन केले.
डोंबिवली पूर्व इंदिरा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असून या परिसराचे सुशोभीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. मात्र हे करत असताना महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरी काढण्यात आली आहे. कंत्राटदार हे काम धीम्यागतीने करत असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ऊनवाऱ्यात हा पुतळा उघड्या अवस्थेत आहे. याविरोधात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शिवसैनिकांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आज आंदोलन केले.
यावेळी कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजित सावंत, उपशहरप्रमुख सुधाकर वायकोळे, उपशहर संघटक संजय पाटील, विभागप्रमुख प्रमोद कांबळे, राजेंद्र सावंत, नितीन पवार, शाम चौघुले, प्रवीण विरकुट, प्रकाश खाडे, तसेच महिला आघाडीच्या प्रियंका विचारे, सानिका खाडे, प्रियंका पाटील, निशा रेडिज, कक्ष शहर संघटक धनंजय चाळके, शाखाप्रमुख आकाश पाटील, मंगेश सरमळकर, अर्जुन मौर्या यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसेनेचे विविध आघाड्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दणक्यानंतर प्रशासन ताळ्यावर; मेघडंबरी बसवणार
आंदोलनाच्या दणक्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी तत्काळ आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी शिवसैनिकांशी चर्चा करत महाराजांच्या पुतळ्यावर लवकरात लवकर मेघडंबरी बसवण्याचे तसेच आवश्यक सुशोभीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे आणि अभिजित सावंत यांनी दिली.