
ठाण्यात उद्या, रविवारपासून ‘उदे गं अंबे उदे’चा जागर घुमणार आहे. निमित्त आहे हिंदू नववर्षानिमित्त सुरू होणाऱया चैत्र नवरात्रोत्सवाचे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उत्सवात यंदा गणपतीपुळे मंदिराची भव्य प्रतिकृती साकारणार आहे. शिवसेनेच्या या नवरात्रोत्सवात गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत भक्तीचा महासागर उसळणार असून अखंड सुरू असणारा नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग हे या उत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.
शिवसेना नेते–माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत असून यंदा या उत्सवाचे तिसावे वर्ष आहे. रविवारी कळवा येथून अंबेमातेच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन होणार आहे. यावेळी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन मिरवणुकीतून घडणार असल्याची माहिती राजन विचारे यांनी दिली.