
शहापूर शहरासाठी नव्याने बांधण्यात येत असलेली पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण केंद्राचे काम वर्षभरापासून रखडल्यामुळे शहापूरकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांना पोटदुखी आणि उलट्यांसह अन्य आजारांचाही त्रास होत आहे. या दोन्ही कामांचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले होते. मात्र उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण होऊनही कामच सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शहापूर नगरपंचायत हद्दीत 9 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे 270 दिवस मुदतीत पूर्ण करून देण्याचे कार्यादेश उल्हासनगर येथील कंपनीला देण्यात आले आहेत. मात्र वर्ष उलटूनही सदर टाकीचे बांधकाम होत नसल्याने शहापूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम वर्षभरात पूर्ण झाले नाही तरी अधिकारी बसून आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेवर 3 एमएलडी कॉम्पॅक्ट जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम बदलापूर येथील माना इलेक्ट्रिक आणि इंजिनीयरिंग सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे. या कामाचीही लटकंती झालेली आहे.
तांत्रिक अडचणी दूर करा
शहापुरातील दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याची टाकी व आरोग्य चांगले राहवे यासाठी फिल्टरेशन प्लाण्ट मंजूर करण्यात आला आहे. नगरपंचायतने कामातील तांत्रिक अडचणी दूर करून येथील पाण्याची टाकी व फिल्टरेशन प्लाण्टचे काम पूर्ण करून शहापूरकराना स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजय देशमुख यांनी केली आहे.
सन 2011 च्या जनगणनेनुसार शहापूर नगरपंचायत हद्दीतील लोकसंख्या 11 हजार 623 इतकी होती. दरम्यान हीच लोकसंख्या 25 हजारांच्या वर गेली असल्याने सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत आहे.
फिल्टरेशन प्लाण्टचे काम नागपूर येथे सुरू असून तो प्लाण्ट मार्च अखेरीस शहापुरात आणून बसवण्यात येणार असल्याचे माना इलेक्ट्रिक सर्व्हिसेसचे व्यवस्थापक मनीष त्रिवेदी यांनी सांगितले.
शहापूरमधील जनतेला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी 9 लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. परंतु ठेकेदार कंपनीच्या उदासीनतेमुळे शहापूर नगरपंचायत हद्दीतील सुमारे 25 हजारच्या वरील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.