
अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या टेंभीनाक्याजवळील चरई भागात एका रात्रीत तब्बल १४ दुकाने चोरांनी फोडली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये मनुष्यबळ कमी असतानाही शेकडो पोलीस व्हीआयपीं आणि मिंधेंच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांच्या सिक्युरिटीत अडकले आहेत आणि त्यामुळेच ठाण्यात चोर माजले असून घरफोड्या आणि दरोडे वाढले आहेत. दरम्यान, भरवस्तीत भुरट्या चोरांनी सलग १४ दुकाने फोडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
टेंभीनाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चरई भागात अनेक व्यावसायिक दुकाने आहेत. आज सकाळी व्यापारी दुकाने उघडण्यास आल्यानंतर त्यांना गाळ्याचे शटर उचकटल्याचे आढळले. एकूण १४ दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसले. या घटनेची माहिती व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलिसांना दिल्यानंतर नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. याप्रकरणी दुकानदार मालकांचे जबाब नोंदविले गेले आहेत. यातील आठ दुकानांमधून चोरट्यांनी २७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल लांबवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्हीत चोर कैद
१४ दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीत चोर कैद झाले असून चोरटा तरुण दुकानात वावरताना दिसत आहे. दरम्यान, नौपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.