डोंबिवलीत भूमिगत जलवाहिन्यांना मोठी गळती, लाखो लिटर फिल्टर पाण्याची रोज गटारगंगा

कल्याण, डोंबिवलीच्या अनेक प्रभागांमध्ये दोन दिवसांतून एकदा पाणी येत असताना डोंबिवलीच्या सावरकर रस्ता आणि नेहरू रस्त्यावर भूमिगत जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती, रोज लाखो लिटर फिल्टर पाणी गटार आणि नाल्यात मिसळत आहे. नागरिकांचे घसे कोरडे असताना दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. केडीएमसीच्या बेफिकीर कारभाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

सावरकर रस्ता हा डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. अलीकडेच या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र डोंबिवली नागरी सहकारी बँकेसमोरील भूमिगत जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी रस्त्यावरून सतत वाहत असते. तर नेहरू रस्त्यावर ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूला अनेक वर्षांपासून भूमिगत जलवाहिनीमधून पाणी गळत आहे. महापालिकेने वेळोवेळी दुरुस्ती केली. परंतु गळती कायम आहे. काही महिन्यांपूर्वी ही गळती थांबली होती पण पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या गळतीमुळे स. वा. जोशी शाळा आणि ब्लॉसम शाळेच्या समोरील रस्त्यावर सतत पाणी साचत आहे.

सकाळ-संध्याकाळच्या वेळी पालक आणि शाळकरी मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ठाकुर्ली उड्डाणपुलावर पूर्व बाजूने जाणाऱ्या वाहनचालकांना या गळतीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे रस्ता खराब झाला असून मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनधारकांना खड्डे चुकवून मार्ग काढावा लागत आहे.

शॉर्टसर्किटचा धोका

भूमिगत जलवाहिनीचे पाणी महावितरणच्या मिनी पिलरमधील जिवंत वीज वाहिन्यांतून वाहत असल्याने शॉर्टसर्किट आणि संभाव्य अपघातांचा धोका आहे. स्थानिक रहिवाशांनी पालिका आणि महावितरण अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी दिल्या आहेत. मात्र गेल्या महिन्याभरात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. पादचाऱ्यांना या ठिकाणी वळसा घालून चालावे लागत असून दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत.

सावरकर रस्ता आणि नेहरू रस्त्यावरच्या जलवाहिनी गळतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अपघात, वाहतूककोंडी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून गळती थांबवावी, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख सचिन जोशी यांनी सांगितले.