कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची कल्याण रेल्वे तिकीट काऊंटरवर लूट, प्रत्येक तिकिटामागे 30 रुपये उकळले

कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची कल्याण रेल्वे स्थानकात गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी होत आहे. या भाविकांची रेल्वे तिकीट काऊंटरवर मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. प्रत्येक तिकिटामागे बुकिंग क्लार्क 30 रुपये उकळत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिकीट काऊंटरजवळच पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्यांच्यासमोर हा प्रकार होत असून कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची लूट करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यावर त्वरित कारवाई करा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्याने 24 तास तेथे गर्दी होते. सध्या कुंभमेळा सुरू असल्याने तिथे जाण्यासाठी विविध भागांतून भाविक गाडी पकडण्याकरिता येतात. मात्र त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन रेल्वेचे कर्मचारी लुटमार करीत आहेत. रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटरवर प्रवासी तिकीट काढण्यासाठी गेले असता सुरू असलेला प्रकार पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कल्याण रेल्वे स्टेशनवरील एका तिकिटामागे जादा पैसे घेतले जात होते. एका तिकीट काऊंटरवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकिटामागे 30 रुपये जादा घेत होता. काही प्रवाशांनी त्याला याबाबत विचारले असता तो अरेरावी करत उत्तरे देत होता. एका प्रवासाने जाब विचारला असता त्याला तिकीट दाखव, असा तिकीट काऊंटरवरील कर्मचाऱ्याने दम दिला.

चौकशी करण्याची मागणी तिकीट काऊंटरवर प्रवाशांकडून कल्याण रेल्वे स्टेशन तिकीट काऊंटरवरील हा कर्मचारी प्रयागराजचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून एका तिकिटामागे 30 रुपये अधिकचे वसूल करीत असल्याचा दावा व्हिडीओ शूट करणाऱ्या प्रवाशाने केला. जाणाऱ्या पण फक्त प्रयागराजला प्रवाशांकडूनच अशाप्रकारे अधिकचे पैसे वसूल करतोय की इतरही प्रवाशांकडून त्याने असे पैसे वसूल केले याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.