
कळव्याच्या सिद्धिविनायक सोसायटीवर उंदरांनी हल्ला केला असून दुर्गंधीमुळे रहिवाशांचे डोके अक्षरशः भणभणले आहे. पूर्वेकडचा नाला कचऱ्याने खच्चून भरला आहे. तरीदेखील ठाणे पालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या संतापाचा कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची शक्यता आहे. एकीकडे नाल्यातील कचरा आणि दुसरीकडे उंदरांचा त्रास यामुळे रहिवाशांना सोसायटीत राहणेही मुश्कील झाले आहे. दरम्यान आठ दिवसांत नाला साफ झाला नाही तर पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
कळवा पूर्वेतील न्यू शिवाजीनगर येथे श्री सिद्धिविनायक सोसायटी असून त्यात आठ बैठ्या चाळी आहेत. या चाळींमध्ये अंदाजे ४० ते ५० कुटुंबे राहतात. गेल्या २० वर्षांपासून ही वस्ती आहे. दोन चाळींच्या मधून नाला गेल्याने नागरिकांना रोज दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने चाळीमध्ये वावरणेही मुश्कील झाले आहे. वर्षातून दोन वेळा नालेसफाई करणे गरजेचे असताना गेल्या वर्षी पावसाळ्याआधी फक्त एकदाच नाल्यातील गाळ काढण्यात आला. मात्र आतापर्यंत या नाल्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला असून गेल्या सहा महिन्यांपासून हा कचरा साचला आहे.
■ नाल्यातील कचरा तसेच उंदरांचा हल्ला यामुळे चाळीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना विविध विकार जडले आहेत.
■ शारदानगर, वाघोबानगर, मफतलाल झोपडपट्टी, शांतीनगर येथून हा नाला कळव्यातील न्यू शिवाजीनगर भागात आला आहे. दोन चाळींच्या मधून त्याचा प्रवाह असल्याने नागरिकांना नाक मुठीत धरूनच राहावे लागते.
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
दुर्गंधीविरोधात श्री सिद्धिविनायक सोसायटीमधील रहिवासी एकवटले असून त्यांनी सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे. लवकरात लवकर नालेसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कळवा उपशहरप्रमुख मुकुंद ठाकूर यांनी दिला आहे.