विकास आराखड्याच्या सुनावणीला मुहूर्त सापडला, ठाण्याच्या वादग्रस्त डिपी प्लॅनवर उद्यापासून सुनावणी

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रसिद्ध केलेला वादग्रस्त नवीन विकास आराखड्याच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या गुरुवारपासून ही सुनावणी होणार असून या आराखड्याच्या विरोधात हरकती, सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला होता. दरम्यान, विकास आराखड्यात कोणते बदल होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे शहराचा तब्बल 20 वर्षांनंतर सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना वाहतूककोंडी, शैक्षणिक दर्जा, डिजिटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सुविधा यासह सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच हा विकास आराखड्यामुळे अनेक इमारती, बैठ्या चाळी, धार्मिक स्थळे, शाळा उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप करत आरक्षणाला अनेक ठिकाणी विरोध झाला आहे. पालिकेने या सुधारित विकास आराखड्यासंदर्भात सूचना, हरकती मागविल्या.

दरम्यान, 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. आता सुनावणीला तब्बल दहा दिवसांनी मुहूर्त मिळाला आहे.

सात हजार हरकती, सूचना

घोडबंदर, कळवा भागातील नागरिकांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे, तर नौपाड्यातील नागरिकांना रस्ता रुंदीकरण हवे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत 7 हजार 500 हून अधिक हरकती, सूचना प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेचे उपसंचालक कुणाल मुळे यांनी दिली आहे.