![shinde patil](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/shinde-patil-696x447.jpg)
कल्याण शीळ मार्गावरील प्रचंड रहदारीची कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण, नवीन पूल उभारणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. यावरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. दोन्ही पलावा पुलाची कामे नामांकित कंपन्यांना न देता आपल्याच मेहुण्या-पाहुण्यांच्या ‘शेल’ कंपन्यांना दिल्याने ठेकेदारांवर कोणाचाही दबाव नाही असे बोलले जात आहे, खरं खोटं त्या ठेकेदारांच्या नाथांचा नाथ ‘एक’ नाथा ‘लाच’ माहीत ! अशी खोचक टीका केली आहे. राजू पाटील यांची ‘एक्स’वरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
टाटा कंपनीने अवघड असणारे निळजे पुलाचे काम अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केले. रस्ता कटिंग करून दुहेरी रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण झाल्याने पूल रहदारीसाठी सुरू झाला. अत्यंत काटेकोर व पद्धतशीरपणे केलेले कामाचे नियोजन व तेवढ्याच चांगल्या पद्धतीने वाहतूक पोलीस विभागाने दिलेल्या योगदानाचे हे फलित असल्याचे राजू पाटील यांनी म्हटले आहे. याचवेळी मात्र त्यांनी रखडलेल्या दोन्ही पलावा पुलांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 2018 ला पलावा पुलांचे काम सुरू झाले आहे. ते अजून पूर्ण का होत नाही, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टोला लगावत चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
एमएसआरडीसी व एमएमआरडीएची तिजोरी ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिकासारखीच रिकामी झाली आहे व त्यामुळेच ठेकेदारांचे बिल द्यायला पैसे नाहीत, असा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. महत्त्वाच्या रस्ते, पुलांची कामे टाटा किंवा एल अॅण्ड टीसारख्या कंपन्यांना न देता आपल्याच मेहुण्यांच्या पाहुण्यांच्या ‘शेल’ कंपन्यांना दिल्याने ठेकेदारांवर कोणाचाही दबाव नाही असे बोलले जात आहे. खरं खोटं त्या ठेकेदारांच्या नाथांचा नाथ ‘एक’ नाथा ‘लाच’ माहीत, अशी ‘एक्स’ वर राजू पाटील यांनी केलेली पोस्ट मिंधे गटाला चांगलीच झोंबली आहे.