![bhiwandi zp school](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/bhiwandi-zp-school-696x447.jpg)
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी मिंधे सरकारच्या काळात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान सुरू केले होते. मात्र अल्पावधीत या योजनेची पाटी फुटली आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या भिवंडीच्या कालवार शाळेला सरकारने 11 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. परंतु निधीअभावी तीन महिन्यांपासून हा चेकच वटला नसल्याचे उघड झाले आहे. हा निधी मिळावा यासाठी शाळा व्यवस्थापन वारंवार पाठपुरावा करत असून त्यांची अक्षरशः फरफट सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील कालवार जिल्हा परिषद शाळेचा शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या योजनेंतर्गत स्पर्धा घेतल्या होत्या.
यात संपूर्ण कोकण विभागात कालवार जिल्हा परिषद शाळेने तिसरा क्रमांक पटकावला होता. 14 ऑक्टोबर 2024 रोजी या शाळेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस म्हणून 11 लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले होते. मात्र निधी उपलब्ध नसल्याने तीन महिन्यांनंतर ही कालवार शाळेला बक्षिसाचा 11 लाखांचा निधी मिळालेला नाही. याप्रकरणी कालवार गावचे सरपंच महेश म्हात्रे यांनी पुणे प्राथमिक शिक्षण संचालक विभागाचे लेखा अधिकारी यांना बक्षीस स्वरूपात मिळालेली रक्कम लवकरात लवकर मिळण्यासंदर्भात लेखी निवेदन अर्ज केला आहे. मात्र निधी नसल्याने शाळेला बक्षिसाची रक्कम मिळाली नाही, अशी माहिती सरपंच महेश म्हात्रे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतकडून प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे मात्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने बक्षिसांची रक्कम मिळालेली नाही. शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील निधी आल्यास कालवार शाळेस निधीचे वाटप करण्यात येईल, असे ठाण्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.