ठाण्यातील आंबेडकरी जनतेने केला एकनाथ शिंदे, नरेश म्हस्के यांचा निषेध; मोर्चाला पाठिंबा न दिल्याने संताप

बिहारमधील बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी हजारो आंबेडकर अनुयायांनी आज ठाण्यात भव्य मोर्चा काढला. पण या मोर्चाला पाठिंबा न दिल्याने अनुयायांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मिंधे गटाचे खासदार नरेश मस्के यांचा जाहीर निषेध केला. तसेच ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने त्यांचाही धिक्कार करण्यात आला.

बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी आज ठाणे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा कोर्ट नाक्यावरील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होऊन तेथे त्याचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चात रिपब्लिकन एकतावादी पक्षाचे नेते नानासाहेब इंदिसे, आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, सुनील खांबे, संदीप खांबे, रामभाऊ तायडे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या मोर्चात जैन, मुस्लीम समाजाचे तसेच चर्मकार बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चेकरांसमोर भाषण करताना भास्कर वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, हा एवढा गंभीर विषय असतानाही शिंदे हे पाठिंबा देण्यासाठी मोर्चाच्या स्थळी आले नाहीत. त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तर माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी खासदार नरेश म्हस्के हे फक्त मतांसाठी दलित समाजाला जवळ करतात, असा आरोप केला.

हेच का तुमचे प्रेम?

ठाण्याच्या राजकारणात आज दिवसभर याच आरोपांची चर्चा सुरू होती. बुद्धगयेच्या मुक्तीसाठी ठाण्यात आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली असतानाच शिंदे यांच्या समर्थकांनी त्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने संताप व्यक्त होत होता. हेच का तुमचे आंबेडकरी जनतेवरील प्रेम, असाही सवाल अनेकांनी केला.