पंचनामा करण्यास गेलेल्या पोलिसांवर उकळते पाणी फेकले, तिघांना अटक

एका गुन्ह्यातील पंचनामा करण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर उकळते पाणी फेकल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये समोर आला आहे. आरोपींनी पोलिसांवर सिलिंडर तसेच भांडीदेखील भिरकावली. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी व एक मदतनीस जखमी झाले असून त्यांच्यावर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून हल्लेखोर पती-पत्नी व
त्यांच्या मुलाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

साहिमा शेख यांचा फ्लॅट वालचंद प्लाझा इमारतीत आहे. त्यांनी हा फ्लॅट आरोपी अजय चौबे याला भाड्याने दिला आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून चौबे भाड्याचे पैसे देत नव्हता. त्यामुळे शेख यांनी त्यांना फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले होते. परंतु फ्लॅट रिकामा करत नसल्याने साहिमा शेख या मंगळवारी आपल्या अन्य मैत्रिणींसह तेथे गेल्या असता चौबे याची पत्नी अनिता व मुलगा अभय यांनी त्यांना मारहाण करत कोंडून ठेवले. या प्रकारानंतर शेख यांनी 112 क्रमांकावरून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी या सर्व महिलांची चौवे कुटुंबीयांच्या तावडीतून सुटका केली.

सिलिंडर फेकला, भांडीही भिरकावली

मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकाराचा पंचनामा करण्यासाठी पोलीस चौबे याच्या घरी धडकले. मात्र दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र काही वेळानंतर चौबे त्याची पत्नी व मुलाने थेट पोलिसांनाच शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने सिलिंडर फेकला तसेच भांडीही भिरकावली. इतकेच नाही तर आधीपासूनच उकळत ठेवलेले पाणी टोपात आणून पोलिसांच्या अंगावर भिरकावले. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंता गायकवाड, हवालदार किरण पवार, दीपक इथापे, रवी वाघ, सन्मान पटवे, पंच विजय सोहनी हे जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अप्पर पोलीस आयुक्तांनी घेतली दखल

पोलिसांवरील हल्ल्याची गंभीर दखल अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी घेतली. त्यांनी रुग्णालयात दाखल केलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.