कल्याणवासीयांना सदस्य नोंदणीसाठी भाजपची लालूच, पक्षाचे सदस्य बना आणि सिटी पार्कमध्ये फुकट प्रवेश करा

भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू असतानाच कल्याणवासीयांनी पक्षाचे सदस्य व्हावे म्हणून भाजपवाल्यांनी त्यांना चक्क लालूच दाखवली. पक्षाचे सदस्य व्हा आणि सिटी पार्कमध्ये फुकट एण्ट्री मिळवा, असे सांगत भाजपने चक्क सिटी पार्कच्या तिकीट खिडकीजवळ सदस्य नोंदणीचा स्टॉल लावला. महापालिकेच्या जागेतच भाजपने पक्ष सदस्य नोंदणी स्टॉल लावल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिका अधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसाठी आपली जागा भाजपला आंदण दिली आहे का, असा संतप्त सवालही कल्याणवासीयांनी केला.

सिटी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ भाजपने शनिवारी सायंकाळी सदस्य मोहीम राबवली. त्यासाठी भाजपने स्टॉल लावला होता. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर सदस्य होणार अशी संकल्पना होती. भाजपचे सदस्य होणाऱ्यांना सिटी पार्कमध्ये फ्री एण्ट्री दिली जात होती. सिटी पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी आकारले जाणारे लहान मुलांसाठीचे 10 रुपये तसेच नागरिकांसाठीचे 20 रुपये भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून भरले जात होते. सिटी पार्कच्या काऊंटर बाहेरच लावलेला हा बेकायदा स्टॉल नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला.

कल्याणमधील सिटी पार्क येथे भाजप सदस्य मोहीम राबवली जात आहे. भाजपचे सदस्य होणाऱ्याला सिटी पार्कमध्ये फ्री एण्ट्री दिली जात आहे. सिटी पार्कमध्ये एण्ट्रीसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते. भाजपचे सदस्य होणाऱ्यांचे शुल्क भाजपकडून भरले जात आहे. त्यामुळे या महापालिकेचे नुकसान नाही, अशी सारवासारव भाजपचे विभाग अध्यक्ष पंडू म्हात्रे यांनी केली.

पालिकेने कोणती हरकतदेखील घेतलेली नाही. कुणाला काही समस्या असेल तर त्याने बिनधास्त तक्रार करा, आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत, अशी मुजोरीही पंडू म्हात्रे यांनी यावेळी केली.

प्रशासनाचे दुर्लक्ष

महापालिकेच्या जागेत होत असलेल्या या सदस्य नोंदणी मोहिमेबाबत कल्याण-डोंबिवली प्रशासनाला काहीच माहिती नाही. याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. सिटी पार्कच्या तिकीट खिडकीजवळच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी मोहिमेचा स्टॉल लावला होता. यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपच्या खालच्या स्तरातील राजकारणाचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.