शुक्लाच्या बायकोला अटक, सर्व आरोपींना 6 दिवसांची कोठडी

मुख्यमंत्री कार्यालयातील फोनची धमकी देऊन गुंडांच्या मदतीने दोन मराठी कुटुंबांवर हल्ला करणारा मुजोर सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाची मस्ती उतरली आहे. पोलिसांनी शुक्रवारी शुक्लासह त्याच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. त्यापाठोपाठ आता त्याची मारकुटी बायको गीता शुक्ला व अन्य चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गीता शुक्ला व अन्य हल्लेखोरांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण पश्चिमेतील योगीधाम-अजमेरा हाईट्स संकुलातील अभिजित देशमुख, त्यांचा भाऊ धीरज आणि विजय कळविकटे या तिघांवर अखिलेश शुक्ला याने भाडोत्री गुंड आणून हल्ला केला होता. यावेळी मुजोर शुक्लाने मराठी माणसांना अर्वाच्य शिवीगाळदेखील केली होती. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. विधिमंडळातदेखील शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आवाज उठवत कठोर कारवाईची मागणी केली होती.

गाडीही जप्त

शुक्ला आपल्या वाहनावर महाराष्ट्र शासनाचा फलक तसेच अंबर दिवा वापरत होता. विशेष म्हणजे चार वर्षांपासून इन्शुरन्स आणि पीयूसीची मुदत संपली असताना खुलेआम नियम पायदळी तुडवत होता. दरम्यान, कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी योगीधाम इमारत गाठत शुक्लाची अंबर दिवा ठेवलेली स्वीफ्ट डिझायर कार जप्त केली. याप्रकरणी त्याला साडेनऊ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.