दिव्यांगांची पालिकेवर धडक, ठाणे पालिकेने दोन वर्षांपासून दिव्यांगांचे 29 कोटी रखडवले

लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, वयोश्री अशा विविध योजनांवर सरकार शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे. त्याचवेळी ठाण्यातील दिव्यांग बांधवांना दोन वर्षांपासून अनुदानाची फुटकी कवडी दिली नसल्याचे समोर आले आहे. मिंधे गटाचे अप्रत्यक्षरीत्या वर्चस्व असलेल्या ठाणे पालिकेने दिव्यांगांचे 29 कोटी रुपयांचे अनुदान लटकवले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही मिंधे गट तसेच पालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याने आज दिव्यांगांनी पालिकेवर धडक देत प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. आमचे पैसे कधी देणार, आता आश्वासने देणे बंद करा, आम्ही सरकारचे लाडके भाऊ नाही का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. दरम्यान प्रशासनाने नेहमीचीच टेप वाजवत लवकरच अनुदान देऊ असे सांगत वेळ मारून नेली.

ठाणे शहरात जवळपास 12 हजारांहून अधिक दिव्यांग बांधव आहेत. प्रत्येक दिव्यांग बांधवांना दरवर्षी 24 हजार रुपये अनुदान दिले जाते. दिव्यांग बांधवांसाठी दिले जाणारे अनुदान 2023 पासून रखडले असल्याने त्यांच्या जीवनात मोठी अडचण निर्माण झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांचे मिळणारे अनुदान सरसकट तत्काळ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आज दिव्यांग बांधवांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
दोन वर्षापासून दिवाळी गोड नाही

दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत दोन वर्षे दिवाळी गोड करू शकले नसल्याने दिव्यांगांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात दिव्यांग बांधवांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरात लवकर मागील दोन वर्षांचे निधी देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.