नालेसफाईसाठी आणलेला सहा कोटींचा रोबो कचऱ्यात, ठाणे महापालिकेचा ‘कचराकुंडी’ कारभार

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई जलदगतीने व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने सहा कोटींचा रोबो आणला. मात्र कोट्यवधींचा हा रोबो तीन वर्षांपासून धूळखात पडला असून साफसफाईसाठी सध्या भाड्यांच्या वाहनांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. स्वतःचा रोबो असताना ही उधळपट्टी नेमकी कुणाच्या फायद्यासाठी केली जात आहे, असा सवाल नागरिकांनी केला आहे. ठाणे पालिकेच्या या ‘कचराकुंडी’ कारभाराची चौकशी करतानाच नालेसफाईतील आर्थिक मलई ओरबाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.

ठाणे महापालिका हद्दीत दरदिवशी किमान एक हजार टन कचऱ्याची निर्मिती होते. हा कचरा वागळे येथील सीपी टँक भागातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर भराव करून नंतर तो कचरा डम्पिंग ग्राऊंडवर पाठवला जातो. तर दुसरीकडे दरवर्षी महापालिका करोडो रुपये खर्च करून वर्षातून दोन वेळा नालेसफाईची कामे हाती घेते. ही सर्व कामे कमी वेळात आणि कमी मनुष्यबळाचा वापर करून रोबोच्या मदतीने करण्याच्या हेतूने ठाणे महापालिकेने साफसफाईसाठी भाड्याच्या वाहनांवर लाखोंची उधळपट्टी ३ वर्षांपूर्वी रोबो विकत घेतला. यासाठी पालिकेने तब्बल 6 कोटी 45 लाख रुपये खर्चदेखील केले. सुरुवातीला या रोबोची मदत घेण्यात आली. परंतु मागील अनेक महिन्यांपासून हा रोबो बाळकूम येथील महापालिकेच्या अग्निशमन केंद्रात धूळखात पडला आहे. या रोबोची देखभालदेखील महापालिका करत नसल्याने आणखी काही महिन्यांनंतर हे यंत्र निकामी होऊन महापालिकेचे पैसे कचऱ्यात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ऑल राऊंडर रोबो असे नाव

दहा टन वजनाच्या या सफाई रोबोने केवळ एक कामगार संपूर्ण नाल्याची सफाई करू शकतो. हा रोबो 360 अंशात कसाही फिरवता येतो. जेसीबी, पोकलेन मशीन व ड्रेजर अशा तीन वेगवेगळ्या मशीनची कामे एकटा रोबो करतो. त्यामुळे नाल्यात, तीन वेगवेगळ्या मशीन उतरवण्याची गरज भासत नाही. नाल्यातील मोठ्या फांद्या, अवजड वस्तूही रोबोमार्फत उचलता येतात. हा रोबो नाल्यात उतरवण्यासाठी रस्ता करण्याची गरज पडत नाही. नाल्यात दोन मीटर पाणी असतानाही हा रोबो सफाई करू शकतो. त्यामुळे त्याला ऑल राऊंडर रोबो असे नाव देण्यात आले होते.