
न्यायालयाचे आदेश मिळताच महापालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र कारवाई सत्र सुरू असतानाच पालिकेच्या नाकावर टिच्चून बेकायदा बांधकाम सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. हायलँड ढोकाळी रस्त्यालगत असलेल्या कैलासनगरात बिनधास्तपणे विनापरवाना इमारत बांधली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ही बाब प्रभाग समिती, महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कैलासनगर परिसरातील टॅक्सने कंपनीची ही जागा असून रस्ता रुंदीकरणानंतर जागेचा काही भाग पडीक होता. अनेक वर्षांपासून मोकळ्या असलेल्या या भूखंडावर सध्या पक्के बांधकाम सुरू आहे. ही जागा विकत घेऊन त्या ठिकाणी बांधकाम केले जात असले तरी त्या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख चंद्रकांत नार्वेकर यांनी केला आहे. या विनापरवाना बांधकामाबाबत त्यांनी महापालिकेला वारंवार पत्रव्यवहारदेखील केला आहे. जर हे बांधकाम विनापरवाना असेल ते निष्कासित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. या बांधकामाला प्रशासनाने एमआरटीपी आदेश दिले आहेत. मात्र कारवाई करण्यासाठी अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांवर दबाव चंद्रकांत नार्वेकर यांनी महापालिकेकडे सदर भूखंडावर कोणाचे आरक्षण होते, बांधकाम कोण करत आहे, बांधकामासाठी परवानगी घेतली आहे का, याबाबत माहिती मागवली. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत कोणतेही उत्तर मिळत नसल्याने हे बांधकाम बेकायदा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. परंतु कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांवर दबाव आहे की काय, असा प्रश्न नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे.